विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली, असं शरद पवार यांनी सांगितले. तसेच भाजपाकडून सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार म्हणाले की, व्यक्तिशा या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. आमची एक तक्रार आहे. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनिधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे. बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे. अनिल देशमुखांची तक्रार पोलीस अधिकाऱ्याने केली. देशमुख तुरुंगात आहे. ज्यांनी तक्रार केली त्यांच्या चौकश्या सुरू आहेत. देशमुख यांना तुरुंगात टाकल्यानंतर चौकशी कशा पद्धतीने किती वेळा केली जाते. सत्तेचा गैरवापर करून कशी केली जाते त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.
अनिल देशमुख यांचं कुटुंब, नातेवाई, चार्टड अकाऊंट, नातेवाईक, सहकारी कर्मचारी, प्रायव्हेट सेक्रेटरी अशा ९५ लोकांवर रेड झाल्या. २०० लोकांना बोलावून चौकशी केली. ईडीचे ५०, सीबीआय २० इन्कम टॅक्सचे २० छापे असे ९० छापे एका व्यक्तीबाबत घातले. प्रशासनात असं मी ऐकलं नव्हतं. एवढे छापे टाकून काही हाती लागत नाही म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकारवर सनसनाटी आरोप केले. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या आरोपांमध्ये शरद पवार यांच्या नावाची ही उल्लेख झाल्याने खळबळ उडाली. मात्र माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा काही संबंध नसल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.