मुंबई: इस्लामपूरमध्ये मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जयंत पाटील यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हावसं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. "आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेलंच नाही", असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुलाखतकारानं पण तुमची इच्छा आहे का? असं जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर "माझी इच्छा असणारच ना...प्रत्येक राजकारणाऱ्याला मुख्यमंत्री व्हावसं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल. शरद पवार जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.
जयंत पाटील यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे काही संधी आहे का?, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकाराने शरद पवारांना विचारला. त्यावर ''उद्या मला मुख्यमंत्री व्हावसं वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही'', असं शरद पवारांनी हसत सांगितले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. त्यासाठी ते कोल्हापूरात आले आहेत.
तत्पूर्वी, "मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे. माझं व्हर्जन जे आहे ते 'लोकमत'मध्ये व्यवस्थित देण्यात आलं आहे. ते मी ट्विटही केलं आहे", असं जयंत पाटील म्हणाले होते. इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमतमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती", असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं. ट्विटसोबतच पाटील यांनी 'लोकमत'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटोही ट्विट केला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून टीका करण्यात येत होती. भाजपा नेते अतुल भातळखकर यांनी 'आता महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत', असा टोला लगावला होता.
जयंत पाटलांचा लोकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा हेतू असावा- रोहित पवार
काम करताना ताकद मिळावी. मंत्री म्हणून असताना ती ताकद असावी. तसेच मुख्यमंत्री असताना मोठी ताकद मिळते. त्याचा हेतू जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा असतो. जयंत पाटलांचा देखील लोकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा हेतू असावा. त्यामुळे त्यांनी असं विधान केलं आहे. जयंत पाटील अनुभवी व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात खूप चांगलं काम केलं आहे, असं रोहित पवार यांनी सांगितले.
जयंत पाटील मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?
इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जयंत पाटील यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हावसं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. "आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेलंच नाही", असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुलाखतकारानं पण तुमची इच्छा आहे का? असं जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर पाटील म्हणाले, "माझी इच्छा असणारच ना...प्रत्येक राजकारणाऱ्याला मुख्यमंत्री व्हावसं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल. शरद पवार जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा सगळ्यांनाच असते. मला वाटतं की इतक्या दीर्घकाळ काम करणाऱ्या प्रत्येकाला किंवा माझ्यापेक्षा मतदारांनाही इच्छा असू शकते. परंतु परिस्थिती, सध्याची संख्या पाहता आमचे ५४ आमदार आहेत. त्यात मला वाटत नाही शक्य होईल. आमचा पक्ष वाढला पाहिजे", असं जयंत पाटील म्हणाले.