Join us

द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे; शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 11:54 AM

सध्या प्रदर्शित होत असलेल्या राजकीय चित्रपटांवर पवारांचं भाष्य

कोल्हापूर: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारित द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तर 25 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापैकी नेमका कोणता चित्रपट पाहणार, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर मी फारसे चित्रपट पाहात नाही. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्या मला मुंबईत ठाकरे चित्रपट पाहायला बोलावलं आहे, असं उत्तर पवार यांनी दिलं. ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर, ठाकरे चित्रपटांची चर्चा आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटांशी संबंधित प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर पवार यांनी त्यांच्या शैलीत भाष्य केलं. 'आमच्या क्षेत्रात नेहमीच सिनेमे पाहावे लागतात. राजकारणात दररोज सिनेमे दिसत असतात. भूमिका बदलत असतात,' असं पवार म्हणाले. सध्या प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांचा आणि येत्या लोकसभा निवडणुकांचा काही संबंध आहे का, असा प्रश्नदेखील त्यांना विचारण्यात आला. त्यावर चित्रपट बघून मतदान ठरत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला ठाकरे चित्रपट पाहणार असल्याचं शरद पवार म्हणाले. 'मी फारसे चित्रपट पाहात नाही. कधीकधी चित्रपट पाहतो. मात्र ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी मुंबईला बोलावलं आहे. त्यामुळे मी उद्या मुंबईला जाणार आहे,' असंही पवारांनी सांगितलं. ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. तर अमृता राव मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. काल मुंबईत या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झाला. 

टॅग्स :शरद पवारद एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरठाकरे सिनेमाराष्ट्रवादी काँग्रेसबाळासाहेब ठाकरेमनमोहन सिंगनरेंद्र मोदी