मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी हाताळलं आहे, त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. शरद पवार यांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अनिल देशमुख म्हणाले की, "विदर्भामध्ये मिहान प्रकल्पामध्ये एक मोठा आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काही अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी शरद पवारांनी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, त्यासाठी संपूर्ण डिटेल्स देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली. या प्रकल्पामुळे विदर्भातील रोजगारात वाढ होईल." ही चर्चा करताना मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं.
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, "मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नाही, असं पुन्हा अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
तत्पूर्वी, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड २०२०' सोहळ्यात घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटके, मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि सचिन वाझे प्रकरणावर थेट भाष्य केले. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय तसेच आयुक्तांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून गंभीर चुका घडल्या आहेत. त्या माफ करण्यालायक नाहीत म्हणूनच पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची बदली केल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. तसेच, गृहमंत्री पदावर यापुढेही तुम्हीच असणार का? या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.
अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद पुढील वर्षभर कायम राहणार का? या प्रश्नावर जोपर्यंत शरद पवार यांचा आदेश आहे, तोपर्यंत मी गृहमंत्री राहणार आहे. गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत, असे त्यांनी अलीकडेच दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितल्याचेही अनिल देशमुख म्हणाले.
सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता
अँटिलियाजवळ स्फोटकं सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तकडाफडकी बदली देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना एनआयए माहिती घेण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे.