मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. शरद पवार यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह या पुस्तकात करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार यांची कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याच्या खुबीवर चर्चा झाली. यावेळी पवार यांनी एक किस्सा सांगितला.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांच्या भाषणांचा काही भाग वाचण्यात आला. त्यानंतर त्या त्या वेळी शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले. यावेळी अभिनेता, कवी किशोर कदम यांनीही पवारांच्याबद्दलचा किस्सा सांगितला. त्यानंतर किशोर कदम यांनी तुम्ही सर्वांना नावानिशी कसे ओळखतात?, असा सवाल शरद पवारांना विचारला.
किशोर कमद यांच्या या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, राजकारणात फार कमी कष्टानं आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळतं, फक्त तुम्ही समोरच्या माणसाचं नाव लक्षात ठेवा. मी मुख्यमंत्री असताना एक महिला मला भेटायला आली. ती माझ्या मतदारसंघातली होती. तिचं काहीतरी काम होतं. मी तिला म्हटलं, काय गं कुसूम मुंबईला कशी, काय चाललंय? तर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली काम होवो न होवो, अशी तिची भावना होती.
शरद पवार पुढे म्हणाले की, लोकांचे खूप छोट्या गोष्टीत सुख असते. म्हणूनच या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील. हे दोघे त्यांना कितीही जुना माणूस भेटला तरी ते त्यांचे नाव लक्षात ठेवायचे. अशा गुणांमुळे समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त होते. यश मिळते, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
हे पुस्तक आपण नरेंद्र मोदींना पाठवायला हवं- शिवसेना नेते संजय राऊत
महाविकास आघाडीचा जो आपण ग्रंध निर्माण केला आहे त्याला भगवे कव्हर आपण घातले आहे, त्याबद्दल आभारी आहे. हे सरकार अवघा रंग एकची झाला असे आहे. नेमकचि बोलणें हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला हवे. कारण महाराष्ट्र हा सतत देशाला काही विचार देत असतो. शरद पवार यांच्या ६१ भाषणाच्या या पुस्तकाची प्रत आपण पंतप्रधानांना देऊ. नेमकचि बोलणें याची फोड करुन त्यांना सांगू, असे संजय राऊत यांनी सांगितले.