शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; दाखला खोटा असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 09:34 AM2023-11-13T09:34:14+5:302023-11-13T09:34:23+5:30
हा खोडसाळपणाचा प्रकार- सुप्रिया सुळे
मुंबई : मराठा आरक्षणाचा तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा तापलेला असतानाच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘ओबीसी’ उल्लेख असलेला दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, हा दाखला खोटा असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. पुरावा म्हणून शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला राष्ट्रवादीने समोर आणला असून या दाखल्यावर ‘मराठा’ असाच उल्लेख आहे. याबाबत खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, व्हायरल होत असलेला दाखला इंग्रजीत आहे. खोडसाळपणा करण्यासाठी असे प्रकार होत आहेत.
बावनकुळेंचे कानावर हात
आम्ही कशाला खोटी प्रमाणपत्रे व्हायरल करू, ती राष्ट्रवादीची परंपरा आहे, आम्ही राष्ट्रीय कामामध्ये गुंतलो आहोत, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला
नागपुरातून खोडसाळपणाचा आरोप
संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी शरद पवारांचा १९५८ सालचा कै. गजाननराव भिवराव देशपांडे शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला समोर आणत पवार यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. नागपुरातून हा खोडसाळपणा घडत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपकडे बोट दाखवले आहे.
शरद पवारांना थकवा, विश्रांतीचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सततचे कार्यक्रम आणि विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीय बारामतीत उपस्थित आहेत. शनिवारी दुपारी विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या बैठकीला पोहोचल्यावर पवार यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांना बोलावून घेत पवार यांची तपासणी केली.