मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी एका महिलेचे फेसबुक लाइव्ह केले. या महिलेने आरोप केल्याने खासदार राहुल शेवाळे अडचणीत आले, पण आता रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीच कारवाईचा इशारा दिला आहे. पीडितेचे नाव घेणे किंवा तिला कॅमेऱ्यासमोर आणणे चुकीचे असल्याचे मत चाकणकर यांनी नोंदवले आहे.
राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राहुल शेवाळेंविरोधातील त्या पीडित महिलेला फेसबुक लाईव्ह करत सगळ्यांसमोर आणले. या FB लाईव्हमध्ये पीडित महिला सांगते की, मी दिल्लीची आहे, मी दुबईला काम करायची. २८ एप्रिल २०२१ ला मी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. माझा जबाब नोंदवला गेला. परंतु आतापर्यंत FIR नोंदवला नाही. खासदार असल्याने राजकीय दबाव पोलिसांवर आणला जातोय. माझं कुटुंब आज उद्ध्वस्त झालं. आम्ही २ वर्ष एकत्र होतो. स्वत:च्या कुटुंबाचा विश्वासघात करून राहुल शेवाळेने मला फसवलं. धमकावून माझं वारंवार शोषण केले गेले. चांगला माणूस म्हणून सुरुवातीला ओळख केली त्यानंतर खरा चेहरा समोर आला असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, मी सगळीकडे न्याय मागितला. परंतु मला कुणीही न्याय दिला नाही. मला खोटी आश्वासने देऊन शोषण केले गेले. मी खासदार आहे पैसे दाबून तोंड बंद करू असं त्यांना वाटतं. मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. आजही माझ्या जीवाला धोका आहे. माझा अपघातही घडवू शकतात. ५ कोटी रुपयांची ऑफर मला दिली होती. आजपर्यंत या प्रकरणी FIR दाखल का झाला नाही? माझ्यासोबत असताना बायकोचा फोन आल्यानंतर तो कट केला जायचा. मराठीत एकमेकांशी भांडण करत होते. पॉझिटिव्ह दिशेने मी या नात्याचा विचार करत होती. पण माझा वापर करून घेण्यात आला. मी माझ्या हक्कासाठी लढत राहणार असं या पीडित महिलेने म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"