Join us

अजितदादांच्या गटासमोर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 7:20 PM

Sharad Pawar And Ajit Pawar: शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी सलग दोन दिवस अजित पवार गटाने जोरदार प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

Sharad Pawar And Ajit Pawar: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही आमदार अजित पवार गटासह सत्तेत सहभागी झाले आहेत. तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहेत. अशातच पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री शरद पवार यांच्या भेटीला जात असून, त्यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अजित पवार गटासमोर शरद पवार यांनी आपली भूमिका अगदी ठामपणे स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

वायबी चव्हाण सेंटर येथे अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत पुन्हा एकदा शरद पवार यांनी पक्षात फूट पडू देऊ नये, अशी विनंती केली. शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटातील मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली नसल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार गटासमोर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्याचे समजते.

भाजपसोबत जाण्याबाबत अजित पवार गटाच्या आमदारांना शरद पवार म्हणाले…

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. भूमिका बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे पवारांनी ठणकावून सांगितल्याचे समजते. भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही. लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी अजितदादा गटाकडे मांडल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात आज ४५ मिनिटे बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी अधिकृतपणे भाजपसोबत यावे, अशी विनंती करण्यात आली, अशी माहिती मिळत आहे. मात्र, शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत भाजपसोबत जाणार नसल्याचे म्हटले आहे, असे बोलले जात आहे. 

दरम्यान, बंगळुरू येथे विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार बंगळुरू येथे जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तसेच विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी एनडीएकडूनही बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या बैठकीसाठी दिल्लीत जाणार आहेत. एनडीएच्या बैठकीला ३८ पक्ष हजेरी लावणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिली. 

 

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षशरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस