“लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार, व्यक्तिगत हल्ला चुकीचा”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 07:39 PM2021-12-05T19:39:30+5:302021-12-05T19:40:24+5:30

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

ncp sharad pawar condemn ink thrown veteran journalist girish kuber in nashik | “लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार, व्यक्तिगत हल्ला चुकीचा”: शरद पवार

“लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार, व्यक्तिगत हल्ला चुकीचा”: शरद पवार

Next

मुंबई: नाशिक येथे सुरु असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दाखल झालेले ज्येष्ठ पत्रकार तथा लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांना छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या काही कर्यकर्त्यांनी काळे फासल्याने खळबळ उडाली. यानंतर आता विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या घटनेवर बोलताना लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे म्हटले आहे. 

अशी काही घटना घडेल याची कुणकुण होती. संभाजी ब्रिगेडचा त्यांच्याशी काही तरी वाद आहे. पण संभाजी ब्रिगेड त्यांना निवेदन देऊन आपले म्हणणे मांडतील असे वाटत होते. पुण्यातून दोन जण मोटारसायकलवरून आले. त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झाले आणि या दोघांनी त्यांच्यावर काळी पावडर फेकली. पंकज भुजबळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत हे लोक काळी पावडर फेकून पळून गेले, असा घटनाक्रम छगन भुजबळ यांनी सांगितला.

लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार

लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला विरोध करण्याचाही अधिकार आहे, पण व्यक्तिगत हल्ला चुकीचा आहे. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणे चुकीचे आहे. पण इथे घडणे आणखी चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच भाजप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचे केंद्रे असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसरे कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही.

प्रवीण दरेकरांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन?

संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्याचे प्रवीण दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले. आम्ही काही संभाजी ब्रिगेडच्या लोकांना शाई फेकायला सांगितली नाही. पण ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती. लिखाण करता आले असते. पण प्रत्येकाची पद्धत असते. काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. त्यामुळे त्यांनी लेखणीपेक्षा अशा गोष्टींना महत्व दिले असेल. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह लिहिले गेले असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणी लिहीत असेल बोलत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही, असे दरेकर यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ncp sharad pawar condemn ink thrown veteran journalist girish kuber in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.