मुंबई: राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात पाहायला मिळते. त्यावरून टीका-टिपण्णीही केली जाते. याबाबत बोलताना, सन २०१९ मधील राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार (Ajit Pawar) यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपसोबत पाठवले, अशी चर्चा होती, हे खरे आहे. पण, मी त्यांना पाठवले असते, तर त्यांनी राज्यच बनवले असते. त्यांनी अर्धवट काही काम केले नसते. मीच अजित पवार यांना पाठवले होते यात काहीच अर्थ नाही. मात्र, माझे एक वक्तव्य शिवसेना आणि भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट बहुमत कुणाकडेच नाही, हे स्पष्ट झाले होते. युती म्हणून पाहिले, तर शिवसेना आणि भाजपकडे बहुमत होते. मात्र, शिवसेना आणि भाजप एकत्र राहणार नाही, हे आम्हाला दिसले होते. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येऊ पाहणाऱ्या भाजप बाजूला करायचे असेल, तर त्यांना सोयीची भूमिका घेणे शक्य नव्हते, असे शरद पवार म्हणाले. मराठी दैनिकाने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी अनेकविध विषयांवर रोखठोक मते मांडली.
ते विधान शिवसेना-भाजपातील अंतर वाढायला उपयोगी पडले
पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर दिल्लीत एक विधान केले की, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेल, तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझे ते एक विधान शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढायला फार उपयोगी पडले, असे शरद पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ते दोघे एकत्र यावेत असा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. शिवसेनेत अस्वस्थता आहे हे दिसत होते. त्यामुळे तेव्हा तात्पुरते पोषक वक्तव्य केल्याने नुकसान होणार नव्हते. माझ्या या एका वक्तव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीसांकडून राष्ट्रवादीसोबत जाण्याचे प्रयत्न होऊ शकतात ही शक्यता निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली, असेही शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदींशी महाराष्ट्रात राष्ट्रवादी-भाजपाने एकत्र येण्यावर चर्चा झाली होती
हे खरे आहे की, माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितले की, हे शक्य होणार नाही, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचे नाही, आपली भूमिका वेगळी आहे. यावर त्यांनी अजूनही विचार करा असे सांगितले. त्यानंतर दीड महिने सरकार स्थापन झाले नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपात खूप अंतर वाढले होते, असेही शरद पवार यांनी म्हटले.