मुंबई: भाजपला कितीही प्रयत्न करू द्यात, पण मी राज्यात त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ठणकावले आहे. सध्याच्या घडामोडींनी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरात व्यक्त केला असताना शरद पवार यांनी भाजपला ठणकावले आहे.
महाविकास आघाडीतील तरुण आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी त्यांची मते जाणून घेत मार्गदर्शन केले. राज्यातील घटनांनी विचलित होऊ नका. भाजपकडून बऱ्याच हालचाली सुरू आहेत. त्यांचा सामना करण्यास आम्ही समर्थ आहोत. भाजपची स्वप्ने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार नाही. तुम्ही मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रीत करा. आपले सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
लवकरच राज्यव्यापीर दौरा
राज्यात अलीकडेच बरेच काही घडत असते. तरुण आमदार त्यावर बरेचदा प्रतिक्रिया देतात. त्याची गरज आहे का, ते तपासून बोलले पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
नवाब मलिकांची खाती आव्हाड आणि टोपेंकडे
सध्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायाचा नाही, या भूमिकेचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला आहे. तसेच नवाब मलिक यांच्याकडे असलेले अल्पसंख्यांक विकास खाते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना तर कौशल्य विकास खाते सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्याकडील परभणीचे पालकमंत्रीपद सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना, तर गोंदियाचे पालकमंत्रीपद प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर दिले जाईल. मलिक हे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणूनही कायम राहतील. पण नरेंद्र राणे आणि नगरसेविका राखी जाधव यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.