Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समितीने याबाबतचा ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
पत्रकार परिषदेत शरद पवारांनी निवृत्ती मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये तुमचा उत्तराधिकारी कोण असेल? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. उत्तराधिकारी निर्माण करेन ही संकल्पना मी ठरवलेल्या गोष्टींपैकी नाही. मात्र, ही गोष्ट माझ्या मनात जरूर आहे की, संघटनेत काही नवीन सहकाऱ्यांना आणून संधी दिली पाहिजे. याबाबत मी सहकाऱ्यांशी चर्चा करेन. काही लोक १०-१५ वर्षे जिल्हास्तरावर काम करतात आणि ते राज्यपातळीवरही काम करू शकतात ही क्षमता त्यांच्यात आहे हे आम्हाला माहिती आहे. तसेच राज्यस्तरावर अनेक वर्षे काम करणारे लोक आहेत जे राष्ट्रीय पातळीवरही काम करू शकतात. त्यांना प्रोत्साहित करणं आणि संधी देणं ही जबाबदारी माझी आणि माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आहे. आम्ही ही जबाबदारी हळूहळू पार पाडणार आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.
लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक
निवृत्तीचा निर्णय मागे घेताना शरद पवार म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केले. देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती, हेच माझ्या परीने प्रदीर्घ सार्वजनिक जीवनाचे गमक आहे, माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारवून गेलो आहे, असे शरद पवार म्हणाले.