विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 03:46 PM2024-11-26T15:46:36+5:302024-11-26T15:49:12+5:30

ईव्हीएमबाबत आलेल्या तक्रारींवर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाकडून घेण्यात आला आहे.

ncp Sharad Pawars candidate meeting decided to start a protest against EVMs | विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!

विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या पक्षाचे नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित बैठकीत बहुतांश उमेदवारांनी शरद पवारांसमोर ईव्हीएमबाबत रोष व्यक्त केला आहे. ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी झाल्यानेच पक्षाला अपयशाचा सामना करावा लागल्याची भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांसह आमदारांनीही मांडली आहे.

विविध नेत्यांनी ईव्हीएमबाबतचे आक्षेप नोंदवल्यानंतर शरद पवार यांनी याबाबत आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचं बैठकीत सांगितल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमबाबत आलेल्या तक्रारींवर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाकडून घेण्यात आला आहे. यासाठी वकिलांची टीमही नेमली जाणार असल्याचे समजते.

"जनआंदोलन उभं करावं लागणार"

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही ईव्हीएमच्या मुद्द्यावर जनआंदोलन उभे करण्याच्या विचारात असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांनी पुढाकार घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व करावं, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याची माहितीही आव्हाड यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, "मी कळवा-मुंब्रा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यातून जिंकलो असलो तरी ईव्हीएममध्ये इतर अनेक ठिकाणी गडबड झाली आहे. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये जर निवडणुका बॅलेट पेपरवर होत असतील तर आपण का घेऊ नयेत?" असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

Web Title: ncp Sharad Pawars candidate meeting decided to start a protest against EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.