Join us  

Video: राष्ट्रवादीने शेअर केला शरद पवारांचा संपूर्ण व्हिडिओ, भाजपला दाखवलं पूर्णसत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 4:00 PM

शरद पवारांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असल्याचं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं होतं. शरद पवारांचा एखादाच फोटो देवासमोर हात जोडलेला किंवा नारळ फोडलेला सापडेल, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे देवासमोरील अनेक फोटो सोशल मीडियातून शेअर केले. आता, पुन्हा एकदा शरद पवार यांचा एका कार्यक्रमातील अर्धवट व्हिडिओ शेअर करुन ते नास्तिक आणि देवद्रोही असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं आहे. 

शरद पवारांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, हा व्हिडिओ अर्धवट असून भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार करत राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानुसार, शरद पवारांनी भाषणात जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा संदर्भ देताना कवितेतील एक कडवं म्हटलं होतं. मात्र, भाजप समर्थकांकडून केवळ तेवढाच सोयीचा व्हिडिओ शेअर करत शरद पवारांनी हिंदू देवतांचा बाप काढल्याचा आरोप करण्यात आला. आता, या आरोपावर एनसीपीने संपूर्ण व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. तर, आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. 

भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडीओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडीओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. 

सर्वच समाजसुधारकांच्या काळात देखील अशा मनुवृत्ती होत्या आणि त्या मनुवृत्तींनी नेहमीच या सर्व समाजसुधारकांचा विरोध केला. आज माऊली, तुकोबा, गाडगेबाबा हे महापुरुष असते तर त्यांना देखील नास्तिक म्हणून भाजपने हिणवले असते. कारण, हाच भाजपचा खरा विचार आणि चेहरा आहे, असे म्हणत रोहित पवारांनी भाजपवर घणाघाती टिका केली. तसेच, असो, हा महाराष्ट्र आहे.. इथे तुमच्या मनुवृत्तीची डाळ कधीही शिजणार नाही, त्यामुळे आता तरी सुधरा!, अशा शब्दात इशाराही दिलाय.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपारोहित पवार