मुंबई: राज्यभरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांच मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्याचे कृषी राज्यमंत्री सगाभाऊ खोत नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नसल्याचे विधान सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. या विधानानंतर राष्ट्रवादीने ट्विटरच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं कार्टूनचं चित्र काढत कांदा- भजी तळून बेरोजगार मेले नाहीत. आता न खाता मरतात का ते पाहू असं म्हणत सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
परतीच्या पावसाने यंदा कांद्याला मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा 50-60 रुपये किलो दराने खावा लागला, तर खुशाल खाल्ला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नसल्याचं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. तसेच कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी 3-4 महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. विनाकारण कांद्याची ओरड थांबवावी, अन्यथा ओरडणाऱ्यांनी शेती घ्यावी आणि ती करावी, असा सदाभाऊ खोत यांनी दिला होता. निफाड तालुक्यातील कोळवाडी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना ते बोलत होते.