इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही; कबरीच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:16 IST2025-03-17T15:15:10+5:302025-03-17T15:16:54+5:30
Jitendra Awhad News: महाभारतातून कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव, महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्मा असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो असं विधान आव्हाड यांनी केले आहे.

इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही; कबरीच्या वादावर जितेंद्र आव्हाड काय बोलले?
Jitendra Awhad News: एकीकडे बीड, परभणी, लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, महागाई यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच आता दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर भाष्य केले आहे.
विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, औरंगजेबाची कबर असली काय किंवा नसली काय त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही. जर औरंगजेबाला काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही. रामायणात रावण काढा आणि राम मला समजून सांगा, महाभारतातून कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव, महाभारत समजून सांगा. असे क्रूर कर्मा असतात म्हणून माझा माणूस हिरो होतो असं विधान आव्हाड यांनी केले आहे.
या सर्व गोष्टीला सरकारचा एक छुपा पाठिंबा आहे
रावणाला बाजूला करून रामायण सांगता येईल का, कौरवांना बाजूला करून महाभारत सांगता येईल का, अफजल खान बाजूला करून प्रतापगडाची लढाई सांगता येईल का, हिटलरला बाजूला करून दुसरे विश्व युद्ध सांगता येईल का, असे प्रश्न आव्हाड यांनी विचारले. या सर्व गोष्टीला सरकारचा एक छुपा पाठिंबा आहे, असा मोठा दावा आव्हांनी केला.
ती कबर छत्रपतींच्या शौर्याचं प्रतीक
शिवाजी महाराजांचं शौर्य, चालाखी त्यांचे एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठे होते, ज्यारितीने त्यांनी अफजल खानाला झोपवला, औरंगजेबाला रोखून धरले. ही पद्धत त्यांचे शौर्य दाखवण्यासाठी तुम्हाला अफजलखान उभावा करावा लागेल. अफजल खान कुठे मेला हे सांगणार कसं, औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही. तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही. शिवाजी महाराजांच्या नंतरच्या पिढीनेही औरंगजेबाला रोखून धरला. अखेरीस दिल्लीचं सल्तनत सोडून दूर आलेल्या औरंगजेब इथेच मृत्यूमुखी पावला असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, औरंगजेबाचे थडगे लोकांना दिसले पाहिजे. औरंगजेबाला इथेच गाडले आहे, हा इतिहास आहे, तो तसाच राहिला पाहिजे, या मताचा मी आहे. पक्षाची भूमिका मांडत नाही. अन्यथा लोकांना इतिहास कसा कळणार. औरंगजेबाला इथे जिंकता आलेले नाही. औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आलेला नाही. ताराराणी आणि इतर शिवरायांच्या मावळ्यांचा तो इतिहास आहे. कबर हटवून कुणाच्या घरची चूल पेटणार आहे का? असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.