Join us  

“केंद्र सरकार कधी पडेल सांगता येत नाही, राज्यात वेळेत निवडणुका घ्यायची हिंमत महायुतीत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 1:07 PM

NCP SP Jayant Patil News: केंद्रातील एनडीए सरकारचा ६ महिने की वर्षभर एवढाच विषय राहिला आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

NCP SP Jayant Patil News: राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. 

लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात २४० वर थांबले. तेव्हा दोघांचे टेकू घेतले. बिहार आणि आंध्र प्रदेश. हे दोघे एवढे पलटी मारण्यात माहीर आहेत की, दिल्लीतील सरकार कधी पडेल याची खात्री नाही. त्यामुळेच ६ महिने की वर्षभर एवढाच विषय राहिला. लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही तर सेक्युलर सिव्हिल कोड म्हणावे लागले. सेक्युलर शब्द तुम्हाला वापरावा लागला यातच तुमची हार आली. १० वर्षांपासून तुम्ही भारतात टेंभा मिरवला. त्यात सेक्युलर शब्द कधी वापरला नव्हता. पण आता तुमच्या लक्षात आले आहे की, हे तुम्हाला सहजासहजी काही चालू देणार नाही, या शब्दांत जयंत पाटील यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यात निवडणुका वेळेवर घेण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही

सरकार निवडणूक कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता. महाराष्ट्र सरकार घाबरणारे सरकार आहे. निवडणुकांची भीती वाटतेय. लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना मोठा धक्का दिला आहे. आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचे धाडस होणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच हे निवडणुका घेतील. १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान निवडणुका घेतील, असा अंदाज आहे. त्याआधी त्यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

दरम्यान, महाराष्ट्रात हिंदू देवस्थानांना शिवाजी महाराजांच्या काळापासून जमिनी देण्यात आल्या होत्या. भाजपाच्या एकदोन आमदारांनी या जमिनी लुटल्या. स्वत:च्या नावावर केल्या. ते करताना नजराणा भरायचा असतो. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करताना भरायचा ५० टक्के नजराणा भरला नाही. विधानसभेत हा विषय मांडला तेव्हा महसूलमंत्री म्हणाले २ महिन्यांत चौकशी करू. पण दोन वर्षांपासून चौकशी पूर्ण झालेली नाही. यावर आधीच न्यायालयात सुनावणी चालू आहे. जमिनी लाटणारेच हा निर्णय व्हावा म्हणून कॅबिनेटच्या बैठकीत बसून होते, असा मोठा दावा जयंत पाटील यांनी केला.

 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस