Join us  

“आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’”; जयंत पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 5:51 PM

NCP SP Jayant Patil Reaction On Maharashtra Budget 2024: हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. आम्ही सत्तेत येऊ तेव्हा जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

NCP SP Jayant Patil Reaction On Maharashtra Budget 2024: राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. पुढील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. परंतु, सत्ताधारी महायुती सरकारकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर भाष्य करताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला दिसत आहे. आता पराभव समोर दिसत असताना, आजच्या बजेटमधून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. हा प्रयत्न तीन महिन्यांसाठी आहे. अगदी बेजबाबदारपणे मांडलेले हे बजेट आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. 

ही सगळी आकडेवारीची जग्लरी आहे

महिला व बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेट पेक्षा ४६ हजार कोटींचे अधिकची प्रोव्हिजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मागच्या वर्षी १ लाख ३० कोटी महसुली तुटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. आता मात्र महसुली तूट २० हजार कोटींची दाखवली. ही सगळी आकडेवारीची जग्लरी आहे. निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. निवडणुका झाल्या की पुन्हा दर वाढवले जातील, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 

वारी, दिंड्यांना राजकारणाशी जोडणे योग्य नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकोबारायांनी वारीसाठी नाजरणा पाठवला होता. त्यावेळी तुकाराम महाराजांनी त्यास स्पर्श न करता तो परत पाठवला. आणि त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून निघणाऱ्या दिंड्यांना मोठी परंपरा आहे. उत्स्फूर्तपणे लोकं वारी प्रतिसाद देतात. त्याला राजकारणासाठी जोडणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी दिड्यांना दिलेल्या अनुदानावर बोलताना सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट सादर केलेले आहे. एमएससीबीची मागची थकबाकी माफ करणे अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणे हे जबाबदारपणाचे लक्षण नाही. म्हणून मी वारंवार सांगतो आहे की, हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर, आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा आम्ही जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2024जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी