Join us  

“भाजपाच्या लाडक्या भावाने स्वतःच्या बहिणीला किती छळले ते राज्याने पाहिले”; आव्हाडांचा टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 7:48 PM

NCP SP Jitendra Awhad Reaction On Maharashtra Budget 2024: हा अर्थसंकल्प फसवा आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

NCP SP Jitendra Awhad Reaction On Maharashtra Budget 2024: राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, महाविकास आघाडीकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. सत्ताधारी महायुतीकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वय वर्षे २१ ते ६० या वयोगटातील महिलांसाठी राबवण्यात येईल. या अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा निधी मिळेल. या योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जुलै २०२४ म्हणजेच पुढच्या महिन्यापासून ही योजना लागू करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना या अर्थसंकल्पावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. 

भाजपाच्या लाडक्या भावाने स्वतःच्या बहिणीला किती छळले ते राज्याने पाहिले

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजपाचा लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण गेले चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला त्यांनी किती छळले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. हा अर्थसंकल्प फसवा आहे. कारण, त्यांनी स्वतः अर्थसंकल्पात लिहिले आहे की, मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत. म्हणजे मूल्यमापन न करता, सुसूत्रीकरण न करता हा अर्थसंकल्प आणला आहे. आता जे काय करायचे आहे ते ती समिती करेल, असे उत्तर द्यायला हे मोकळे होतील, अशी टीका आव्हाड यांनी केली. 

दरम्यान, राज्यात १० हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील. महिलांना बस प्रवासात सवलत देण्यात येणार आहे. महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. वर्षाला एका कुटुंबाला ३ सिलेंडर मोफत दिले जातील. बचत गटाचा निधी १५ हजारांवरुन ३० हजारांवर वाढवण्यात येणार आहे. २५ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :महाराष्ट्र बजेट 2024जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडी