Join us  

“भाजपाचा विचार संपतो, तिथे शरद पवारांचा सुरु होतो, आमच्यात येणारे खूप, पण...”: रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 8:45 PM

NCPSP Rohit Pawar News: १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

NCPSP Rohit Pawar News: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच विधिमंडळातील विविध नेत्यांच्या भेटी-गाठीही चर्चेच्या विषय ठरल्या. यातच अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटात येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी महायुती सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली.

पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की,  जिथे भाजपाचा राजकीय विचार संपतो तिथे शरद पवारांचा विचार सुरु होतो. भाजपला आणि महायुतीच्या अनेक नेत्यांना कळणार नाही की काय घडले आहे, याचा एक ट्रेलर लोकसभेमध्ये आपण सर्वांनी पाहिला आहे. विधानसभेमध्ये महायुतीचे सर्व नेते तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे. १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचे नाही घ्यायचे हे ते दोघेच ठरवतील, असे सूचक विधान रोहित पवार यांनी केले. 

ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा काय होते

जयंत पाटील हुशार नेते आहेत. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा काय होते. येणारे खूप आहेत घ्यायचे किती हा प्रश्न आहे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेतील, असे सांगताना भाजपाचे नेते वागण्यामध्ये अजित पवारांसोबत दुजाभाव करत आहेत. भाजपा नेते करतच होते आता कार्यकर्ते अजित पवारांच्या विरोधात बोलायला लागले हे आश्चर्य आहे, असे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांबद्दल बोलणे बरेच जण टाळत होते कारण त्यांचा वेगळा दरारा होता, तो दरारा भाजपासोबत गेल्यावर कमी झाला आहे. भाजपासोबत अजित पवार राहिले तर त्यांना २० सीट त्यांना लढाव्या लागतील. अजित दादांचे आमदार खुळे नाहीत, त्यांना माहित आहे की, भाजपा कोणत्या पातळीवर जाऊ शकते. येत्या काळात अजित पवारांची अजून राजकीय ताकत कमी करताना भाजपा दिसेल, असा दावा रोहित पवार यांना केला. 

टॅग्स :रोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारभाजपाशरद पवारजयंत पाटील