मुंबई- शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाच हात होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून राज्यात कसं शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान सुरू आहे याची माहिती दिली.
आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराचा इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीचा विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना फुटलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचाच हात राहिला आहे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला.
दीपक केसरकरांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलं आहे. दीपक केसरकरांचं वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे. दीपक केसरकरांना इतिहास माहीत नसावा. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध मधुर होते, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. तसेच तुमचं सरकार बेकायदेशीर आहे आणि शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर सुध्दा बेकायदेशीर प्रवक्ते आहेत, अशी टीकाही महेश तपासे यांनी यावेळी केली.
दरम्यान, बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असं म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीनं एकट्यानं निवडून यावं, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचं टॉनिक मिळालं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.
शरद पवारांमुळे शिवसेना प्रत्येकवेळी फुटली
राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रत्येक ठिकाणची भाषणं पाहा. त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे याचंच ते प्लानिंग गेले अडीच वर्ष करत आहेत आणि तसं करण्यासाठी शिवसैनिक जर पालखीचे भोई ठरणार असतील तर ते मान्य आहे का? याचा विचार शिवसैनिकांनी करायला हवा, असंही केसरकर म्हणाले. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली यामागे शरद पवारांचाच हात आहे आणि याचा मी साक्षीदार असल्याचं सांगताना केसरकर यांनी महत्वाची माहिती दिली.