मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावर तर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आगपाखड करण्यात आली. जवळपास दीड तास एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे भाषण केले. मात्र, हे भाषण अपेक्षेइतके रंगले नाही, अशी टीका विरोधक आणि नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी देखील एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. टेलिप्रॉम्प्टर इतका महाग आहे का ? ५० खोक्यात पण घेता नाही आला..भाषण देताना सतत खाली मान घालून कागदावर लिहलेले वाचाण्याचे कष्ट नसते झाले. थोडी तरी इज्जत वाचली असती, असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यात काल जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मोठा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे एक लाख २५ हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे ६५ हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी आपल्याला साथ देण्याचे आवाहन तमाम शिवसैनिकांना केले तेव्हा शिवसैनिकानी हात उंचावले. मी पुन्हा एकदा शिवसैनिकाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून दाखवेन. अंगावर ते आलेच आहेत तर त्यांना शिंगावर घेवूच. दर निवडणुकीत त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कटप्पा प्रामाणिक होता, पण तुम्ही तर दुटप्पा- एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना 'बाहुबली'तील कपट्टाची उपमा दिली. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. "आम्ही कटप्पा असू तर तो कटप्पापण प्रामाणिक होता. तुम्ही तर दुटप्पा निघालात. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही पक्ष वाढीसाठी काय केलं? कुणाला कधी चापट तरी मारलीय का? तुम्हाला कोथळा काढण्याची भाषा शोभत नाही. इथं एकनाथ शिंदेंच्या अंगावर १०० केसेसे आहेत. त्या काय चोरीच्या केसेस नाहीत. माझ्या नातवावर टीका करता. काय वेळ आली तुमच्यावर. माझ्या दीड वर्षांच्या नातवाचा काय दोष?, खरंतर रुद्रांशच्या जन्मानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. दीड वर्षाच्या बाळावर कसली टीका करता", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"