'राजकारणात सध्या राज ठाकरे ही जबाबदारी निभावताय'; राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 09:42 AM2022-10-18T09:42:04+5:302022-10-18T10:06:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पत्रावर भाष्य केलं आहे.
मुंबई- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी याबाबत पत्र लिहून अंधेरी पूर्वची पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला. तसेच उमेदवार मागे घेतल्यानंतरही राज ठाकरेंनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे आभार मानेले आहे.
राज ठाकरे यांनी सर्वप्रथम पत्र लिहून भाजपला अंधेरीतील पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घ्वायी, अशी विनंती केली होती. त्यानंतर, शरद पवारांचे आवाहन आणि प्रताप सरनाईक यांचे पत्र, त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये तातडीच्या बैठका झाल्या आणि अखेर शिवसेना उमेदवार ऋुतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. भाजपने उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीसह मनसेकडूनही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.
सदर प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट केलं आहे. कॉलेजमधील प्रेमी युगुलांना लव्ह-लेटर लिहून देण्याची जबाबदारी ही नेहमी तिसर्या अनुभवी लव्ह लेटर लिहिणाऱ्या व्यक्तीवर असते. राज्याच्या राजकारणात सध्या असाच पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी सध्या राज ठाकरे निभावत आहेत, असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.
काॅलेजातल्या प्रेमी युगुलांना लव्ह-लेटर लिहून देण्याची जबाबदारी ही नेहमी तिसर्या अनुभवी लव्ह लेटर लिहिणाऱ्या व्यक्तीवर असते. राज्याच्या राजकारणात सध्या असाच पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी सध्या राज ठाकरे निभावता आहेत. @RajThackeray@Dev_Fadnavis@cbawankule
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) October 18, 2022
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर भाजपनेही निर्णय घेतल्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चा आणखी घट्ट झाल्या आहेत. मात्र, त्यावर, बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे नेहमी राज्याच्या हिताचीच भूमिका घेतात. मात्र, भाजपचा हा निर्णय म्हणजे मनसे-भाजपच्या युतीची नांदी नाही. राज ठाकरे व शरद पवार यांनी घेतलेली भूमिका हा वेगळा भाग होता. शीर्षस्थ नेतृत्वाने हा निर्णय घेतला. अशा प्रकरणात संवेदनशीलता दाखविणे आवश्यक आहे. आम्ही कुठलीही पळपुटी भूमिका घेतलेली नाही. २०२४ मध्ये आम्ही येथे लढू आणि जिंकू, असे बावनकुळे यांनी म्हटले.