कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. यावरुन आता आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी आता आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गर्दीतून वाट काढताना त्यांच्या स्वभावानुसार ते सर्वांना बाजूला करत आहेत. हे सर्व दिसत आहे. तरीही असा गुन्हा दाखल झाला लोकांना या गोष्टी समजतात. आज आव्हाड यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे आम्ही त्यांना राजीनामा देऊ देणार नाही. पक्षाला त्यांचा राजीनामा देणे मान्य नाही. त्यांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
अशा पद्धतीने खालच्या पद्धतीवर राज्याचे राजकारण गेले नव्हते. काल रात्री उशीरा ही घटना घडली. विरोधकांना नामहरण करण्यासाठी यांचे हे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून या गोष्टी केल्या पाहिजेत. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा मोठी होणार आहे, कुठल्या दबावाला बळी पडायचे हे पोलिसांनी ठरवले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय: जितेंद्र आव्हाड
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असं ट्विट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसंच लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे राजीनामा देणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
"पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही कलम ३५४, मी या पोलीसी अत्याचाराविरुद्ध लढणार...मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे. लोकशाहीची हत्या...उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत", असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात येताना गर्दीत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला देखील होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे. आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा आरोप या ४० वर्षीय महिलेनं केला आहे. महिलेनं तातडीनं याची माहिती पोलिसांनी दिली. तर पोलिसांनी महिलेला याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार महिलेनं मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.