मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज ठाकरे यांची आईचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे उपचारासाठी आता लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे पुणे, नाशिक यांच्यासह विविध शहरांचे दौरे करत होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पुण्यात पार पडली होती. मात्र आज राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या एका सदस्याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपण लवकरात लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या मास्कबाबतच्या पत्राची आठवण देखील क्लाईड क्रास्टो यांनी करुन दिली आहे.
क्लाईड क्रास्टो ट्विटरद्वारे म्हणाले की, गेट वेल सून राज ठाकरेजी, मी आपणांस एका पत्राद्वारे मास्क परिधान करण्याची विनंती केली होती. तज्ञ नेहमी सांगतात की, मास्क हे एक कवच आहे, जे आम्हाला कोरोनापासून सुरक्षित ठेवते. आता आपणही मास्क परिधान करा, अशी विनंती क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
दरम्यान, राजसाहेब, तुम्ही लोकांसाठी एक प्रेरणा आहात, आपण जे बोलता त्या प्रत्येक शब्दाचं पालन आणि अनुकरण केलं जातं. आपला एका मोठा चाहता वर्ग आहे. आपण त्यांचे गुरू, मित्र आणि मार्गदर्शक आहात. आपली भाषणं केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशात पाहिली जातात. त्यामुळे कोविड विरुद्धच्या लढाईत आपली भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, की राजसाहेब तुम्ही मास्क घाला. केवळ तुमच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर देशातील इतर नागरिकांसाठीही एक उदाहरण ठेवा, असं क्लाईड क्रास्टो यांनी ६ मार्च २०२१ रोजी राज ठाकरेंना पत्राद्वारे म्हटलं होतं.
मनसेचे मेळावे रद्द-
मुंबईतील भांडुप येथे शनिवारी, तर रविवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शाखाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज ठाकरे आजारी असल्याने सर्व मेळावे शुक्रवारीच रद्द करण्यात आले होते. दरम्यान, लवकरच हे दोन्ही मेळावे पुन्हा एकदा आयोजित केले जातील, असे मनसेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मध्यंतरी अयोध्येतील संतमहंतांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेत अयोध्या भेटीची निमंत्रण दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलतात, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.