लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हार्बर मार्गावर एका धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. द्वितीय श्रेणीच्या महिलांच्या डब्यात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ०७ वाजून २८ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT वरून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला आहे. "पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"संतापजनक! चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
आरोपी ट्रेन सुरू होताच महिलांच्या डब्यात चढला आणि तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणी ट्रेनमधून उतरली आणि तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि आठ तासांत आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीचे नाव नवाज करीम असून, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.