Join us

“निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही”; राष्ट्रवादीचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:56 AM

Rajya Sabha Election Result 2022: भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे, त्यात नारायण राणेंची दोन मुले अग्रेसर आहेत, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.

मुंबई: राज्यसभेत (Rajya Sabha Election Result 2022) भाजपने दिलेला अतिरिक्त उमेदवार निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र झाल्या आहेत. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीवर भाजपकडून ताशेरे ओढले जात आहेत. यातच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार () यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावार मोठे झाले असून, त्यांना स्वतःची अक्कल नाही, असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

राज्यसभा निवडणुकीवरून निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अडचणीचे ढग दिसले की, अजित पवार मिस्टर इंडियासारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरे झाले अजित पवार यात पडले नाहीत, कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार, असा टोला निलेश राणे यांनी लगावला होता. याला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही

निलेश राणे कोण आहेत? त्यांना आम्ही ओळखत नाही. अजित पवार दिवसरात्र काम करणारे नेते आहेत. निलेश राणे आपल्या वडिलांच्या जीवावर मोठे झालेले लोक आहेत. त्यांना स्वतःची अक्कल नाही. भाजपमध्ये ज्या बरळणाऱ्या लोकांना घेतले आहे त्यात नारायण राणेंची दोन मुले अग्रेसर आहेत, या शब्दांत विद्या चव्हाण यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही अपक्ष व छोट्या पक्षांच्या साहाय्याने भाजपने तीन जागा जिंकल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची कसोटी लागणार आहे. अपक्षांची खात्री देता येत नसल्याने आणि गुप्त मतदान पद्धतीमुळे स्वपक्षीय आमदारांच्या मतांची फाटाफूट होऊ नये याची खबरदारी महाविकास आघाडीला घ्यावी लागणार आहे. त्यातच विधान परिषदेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळाच आला आहे. राज्यसभेपाठापोठ विधान परिषदेतही पराभव झाल्यास महाविकास आघाडी सरकारचे स्थैर्यच धोक्यात येऊ शकते, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :राज्यसभानिलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसभाजपा