एनसीपी व्हायरस अन् भारत जलाओ पार्टी, प्रचंड गदारोळ, कामकाज तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:30 AM2020-03-15T03:30:03+5:302020-03-15T03:30:31+5:30
मुनगंटीवार यांनी, सभागृहात काल एनसीपी (नॉव्हेल कोरोना व्हायरस निमोनिया) कोरोना व्हायरसची चर्चा झाली असे विधान केल्याने राष्ट्रवादीचे सदस्य अधिकच संतप्त झाले.
मुंबई : ‘कोरोनासंदर्भातील एनसीपी व्हायरसची चर्चा जोरात आहे’, हे भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य आणि दोन मंत्र्यांबाबत त्यांनी केलेले विधान, त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी, भाजपचा ‘भारत जलाओ पार्टी’ असा तर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी, ‘भारत जलाओ व्हायरस’ असा केलेला उपरोधिक सल्ला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संसदीय आयुधांचा अचूक वापर करीत सीएएवर दिलेले भाषण पण सत्तापक्षाने त्यावर घेतलेली तीव्र हरकत व त्यावरून झालेल्या गदारोळाने शनिवारी विधानसभेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले.
सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात आहे. उलट सरकारने अफवा, गैरसमज दूर करण्याची भूमिका घेतली पाहिजे. दिल्लीत पंतप्रधानांशी भेटीनंतर सीएएचे समर्थन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंतर यू टर्न घेतला, अशी टीका अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस हे ‘स्कोप’च्या बाहेर बोलत आहेत, असा आक्षेप सत्तापक्षाच्या सदस्यांनी घेताच फडणवीस आणि मुनगंटीवार यांनी पुस्तकातील नियमच वाचून दाखविले. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ उत्तर देत विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला विषय संपूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याचा अर्थसंकल्पिय पुरवणी मागण्यांशी संबध नसल्याचे निदर्शनास आणून दिले. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, अनिल परब हे मंत्री उभे राहून आक्षेप घेऊ लागले. ‘तुम्हाला सत्य का झोंबते, तुमचे दबावतंत्र चालणार नाही, अफवांमुळे दंगली उसळल्या, असे फडणवीस म्हणाले.
त्यावर, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले की, ज्या काही दंगली झाल्या त्या तुमच्या राज्यात झाल्यात. या प्रश्नांवर राज्यात एकही दंगल झालेली नाही. त्यामुळे राज्यातील चांगले असलेले वातावरण तुम्ही दुषित करू नका असे सांगत याविषयावर चर्चा होवू शकत नसल्याचे स्पष्ट केले. परब यांच्या वक्तव्याने भाजपच्या सदस्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष नाना पटोले हे दोन्ही बाजूंच्या सदस्यांना शांत राहण्यास सांगत होते, पण कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. सीएए हा केंद्राचा कायदा असल्याने आणि न्यायप्रविष्ठ असल्याने त्याची सभागृहात चर्चा करता येणार नाही, असा मुद्दा नवाब मलिक यांनी उपस्थित केला. संसदीय मंत्र्यांना काही वावगं वाटत असेल तर त्यांनी माझ्यावर हक्कभंग आणावा, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. मुनगंटीवार यांनी, सभागृहात काल एनसीपी (नॉव्हेल कोरोना व्हायरस निमोनिया) कोरोना व्हायरसची चर्चा झाली असे विधान केल्याने राष्ट्रवादीचे सदस्य अधिकच संतप्त झाले.