उत्तर प्रदेशसह मणिपूर आणि गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार; शरद पवार यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 07:57 AM2022-01-12T07:57:17+5:302022-01-12T07:57:34+5:30

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार सिराज मेहंदी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

NCP will fight in Uttar Pradesh, Manipur and Goa; NCP Chief Sharad Pawar made it clear | उत्तर प्रदेशसह मणिपूर आणि गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार; शरद पवार यांनी केलं स्पष्ट

उत्तर प्रदेशसह मणिपूर आणि गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार; शरद पवार यांनी केलं स्पष्ट

Next

मुंबई : मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी मंगळवारी दिली. काँग्रेससह विविध समविचारी पक्षांची आघाडी करत भाजपला पर्याय द्यावा लागणार आहे. काँग्रेसला वेगळे जायचे असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. मात्र, जिथे काँग्रेसला एकत्र घेऊन पर्याय देता येऊ शकतो, तिथे आपल्याला पुढे यावे लागेल, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे माजी आमदार सिराज मेहंदी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार म्हणाले की, मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. तिथे काँग्रेससोबत आम्ही पाच जागा लढविणार आहोत.  

युपीए, काँग्रेस आणि पवारांचा खुलासा

शरद पवार युपीएचे नेते बनले, तर ते देशात बदल घडवतील. कारण पवार बदल घडविण्यात माहीर आहेत, असे सिराज मेहंदी यावेळी म्हणाले. यावर पवार यांनी तिथेच तातडीने खुलासा केला. मेहंदी यांनी युपीएबद्दल सांगितले, त्याबाबत मी सहमत नाही. कारण युपीएमध्ये आम्हाला एकत्र येऊन लोकांना पर्याय देण्याची गरज आहे.

देशातील सद्यस्थिती पाहता, काही राज्यांमध्ये काँग्रेसला बाजूला सारून जमणार नाही. त्या ठिकाणी काँग्रेसला सोबत घेऊन जावे लागेल. ज्या ठिकाणी काँग्रेसला वेगळे जायचे असेल, त्या ठिकाणी ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. पण, जिथे काँग्रेसला एकत्र घेऊन पर्याय देता येऊ शकतो, तिथे आपल्याला पुढे यावे लागेल.

अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनांना छेद देणारे विधान मुख्यमंत्री पदाला शोभा देणारे नाही. पण, याेगींच्या जे मनात आहे, ते त्यांच्या ओठावर आले आहे. धार्मिक ध्रुवीकरण हाच भाजपच्या निवडणुकीचा गाभा आहे. परंतु, उत्तर प्रदेशची जनता त्याला नाकारेल.     - शरद पवार 

गोव्यातील महाविकास आघाडीसाठी चर्चा 

गोव्यात काँग्रेस, तृणमूल आणि राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. आमची यादी दोन्ही पक्षांकडे दिली आहे. दोन दिवसात अंतिम निर्णय होईल. शिवाय, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. गोव्यात भाजपला हटविण्यासाठी एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व काँग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे, असेही पवार यांनी सांगितले.

Web Title: NCP will fight in Uttar Pradesh, Manipur and Goa; NCP Chief Sharad Pawar made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.