Join us

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व कायम राखणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:29 PM

आज संपूर्ण देशात ज्या विचारधारेला आपण सातत्याने विरोध केला त्या विचारधारेचं सरकार आलं आहे. गांधी, नेहरु, आंबेडकर, शाहू यांनी व्यापक समाजाचा विचार लोकांमध्ये मांडला.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतच्या बातम्या सुरु होत्या. राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देऊनही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कूजबूज सुरुच होती. मात्र राष्ट्रवादी पक्ष मजबूत ठेवायचा असून विचारधारेशी तडजोड न करता राष्ट्रवादीचं अस्तित्व स्वतंत्र ठेऊन आपल्याला पुढे काम करायचं आहे असा विश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. 

यावेळी बोलताना शरद पवारांनी सांगितले की, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. नव्या दमाने कार्यकर्त्यांनी पक्ष उभारलं, 14 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी अनेक विकास कामे केली. काम करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे जावं असं लोकांमध्ये चर्चा व्हायची असं सांगून पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्यापेक्षा विधानसभेची तयारी करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. 

तसेच आज संपूर्ण देशात ज्या विचारधारेला आपण सातत्याने विरोध केला त्या विचारधारेचं सरकार आलं आहे. गांधी, नेहरु, आंबेडकर, शाहू यांनी व्यापक समाजाचा विचार लोकांमध्ये मांडला. या विचारधारेने पक्ष मजबूत ठेवायचा आहे असं शरद पवारांनी सांगितले. दरम्यान संसदेचे अधिवेशन सुरु होईल. यात अनेक सदस्य असे आहेत ज्यांच्याविरोधात गंभीर खटले आहेत. त्यांना तिकीट देणे हे राजकीय पक्षाला न शोभणारं आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं सांगून शरद पवारांनी भाजपावर टीका केली त्याचसोबत लोकांच्या प्रश्नी आंदोलन करणं हे त्यावेळी खटला होणं हे राजकीय सन्मानाचं प्रतीक आहे असंही कार्यकर्त्यांना सांगितले.   

लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपाकडे चेहरा नाही. महाराष्ट्रात पर्याय कोण देवू शकतो असा लोकांना प्रश्न आहे. त्यामुळे आपण लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय द्यायचा. त्यासाठी आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवं असेही शरद पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारभाजपा