दिंडोशीमध्ये राष्ट्रवादी करणार नाही शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:12 AM2021-02-08T03:12:12+5:302021-02-08T03:12:39+5:30
वीस वर्षांपासूनची परंपरा होणार खंडित
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत उत्तर पश्चिम जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यंदा दिंडोशी, मालाड (पूर्व) कुरार येथे गेल्या २० वर्षांपासून चालत आलेली परंपरा खंडित करीत शिवजयंती महोत्सव यंदा मोठ्या स्वरूपात साजरा करणार नाही; परंतु आपल्या कुरार गावातील पक्षाच्या कार्यालयासमोर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून छोटेखानी कार्यक्रम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेली २० वर्षे दरवर्षी मोठ्या प्रमाणात येथे चारदिवसीय शिवजयंती उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होतो. पक्षाचे दिग्गज नेते आवर्जून येथील कार्यक्रमाला येतात. गेली तीन वर्षे ‘लोकमत’ येथील महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते.
तारखेप्रमाणे होते साजरी शिवजयंती
सन २००१ पासून कुरार व्हिलेज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे आघाडी सरकार असताना तारखेप्रमाणे शासकीय शिवजयंती करण्याची घोषणा केली.
हळूहळू या महोत्सवास मोठे स्वरूप प्राप्त होत गेले. या महोत्सवास मंत्री सिनेकलावंत हजेरी लावू लागले. सतत चार दिवस कार्यक्रमाची रेलचेल असायची.
कोरोनाच्या नियमांचे होणार कडेकोट पालन
आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. कोरोनासारख्या विषाणूने जगाला ग्रासले असून राज्य सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणली आहे. यासाठी एक नियमावली तयार केली आहे.
अजित रावराणे यानी सांगितले की, यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ तारखेला शासकीय शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी न करता कुरार येथील पक्ष कार्यालयासमोर महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिलांचा हळदीकुंकू समारंभ आयोजित केला आहे.
दरवर्षी किमान बारा हजार स्त्रियांना आपण येथे शिवजयंतीला आमंत्रण देतो; परंतु यावर्षी सहा ते सात हजार स्त्रियांना निमंत्रण दिले आहे. जास्त घोळक्याने न येता तोंडावर मास्क व सॅनिटायजर लावून समारंभात भाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.