Join us

भाजपाच्या 'महाजनादेश' यात्रेला राष्ट्रवादी 'शिवस्वराज्य' यात्रेने देणार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 2:34 PM

भाजपाच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकीकडे इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात येत असतानाच थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने महाजनादेश यात्रेची घोषणा केली आहे. दरम्यान, भाजपाच्या या महाजनादेश यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार असून, खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 6 ऑगस्टपासून या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर खिंडार पाडले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील विविध भागामधील दिग्गज भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणनीती आखण्यात येत असून, भाजपाच्या महाजनादेश यात्रेला शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू करण्यात येणार असून, कोल्हे यांच्या लोकप्रियतेमुळे ही यात्रा यशस्वी होईल अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आशा आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्ट रोजी शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथून सुरू होणार आहे. तर सिंदखेडराजा येथे या यात्रेचा समारोप होईल.    दुसरीकडे  राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ४३८४ किमीचा प्रवास करणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.  या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल. या यात्रेचे प्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर हे आहेत.  .

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राजकारण