मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समितीचीही घोषणा केली होती. या समितीची बैठक आज सकाळी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात होणार आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार याच बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले. अजित पवार पक्ष कार्यालयाच्या परिसरात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा सुरु केल्या. 'देश का नेता कैसा हो...शरद पवार जैसा हो...', अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अजित पवार यांनी कोणतीही रिअॅक्शन न देता पक्षाच्या कार्यालयात निघून गेले.
या समितीत असलेल्या बहुतांश नेत्यांनी पहिल्याच दिवशी पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जाहीरपणे केली होती. त्यामुळे हेच नेते समितीच्या बैठकीत वेगळी भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. मंगळवारी शरद पवारांनी राजीनामा दिल्यापासून या नेत्यांनी सलग तीन दिवस शरद पवारांबरोबर या विषयावर चर्चाही केली आहे. तसेच शरद पवारांनीही समितीचा निर्णय आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका जाहीर केली आहे.
अशी आहे समिती
समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.
अध्यक्ष निवड समितीत खडसेंचा समावेश
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड समितीची मंगळवारी शरद पवारांनी घोषणा केली त्यावेळी एकनाथ खडसे यांचे नाव या समितीत नव्हते. मात्र गुरुवारी शरद पवारांनी खडसेंच्या नावाचा समावेश करण्याची सूचना केली. त्यानुसार या समितीत खडसेंचा समावेश करण्यात आला असून शुक्रवारच्या बैठकीला येण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी खडसे यांना फोनही केल्याचे सूत्रांनी सांगितले.