एनसीपीएचा प्रवाह नृत्य महोत्सव यंदा मुंबईत
By स्नेहा मोरे | Published: November 29, 2023 08:02 PM2023-11-29T20:02:35+5:302023-11-29T20:03:32+5:30
भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शन अनुभवण्याची कलारसिकांना संधी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - नरिमन पाॅईंट येथील नॅशनल सेंटर फाॅर परफाॅर्मिंग आर्टस येथे प्रवाह नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते ८ डिसेंबर रोजी नॅशनल सेंटर फाॅर परफाॅर्मिंग आर्टस संस्थेच्या एक्सपरिमेंटल थिएटर आणि टाटा थिएटर येथे हा महोत्सव पार पडणार आहे.
या महोत्सवात सोफोक्लीस अँटिगोनच्या प्राचीन क्लासिकवर समकालीन भूमिका घेणाऱ्या एकल सादरीकरणापासून ते भरतनाट्यम आणि कुचीपुडी यांच्यातील युगल गाण्यापर्यंत विविध नृत्य प्रकार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शनाचा अनोखा मिलाप या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे. मुंबईतील प्रेक्षकांना जगातील विविध भागातील पारंपारिक तसेच उदयोन्मुख नृत्यशैली शोधण्याची संधी उपलब्ध करून देणे. तसेच, विविध कला - कलाकारांना सक्षम करणे हा नृत्य महोत्सवाचा उद्देश आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जोन क्लेव्हिल अँटीगोन- इंटरप्टेड हे मंत्रमुग्ध करणारे एकल सादरीकरण करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ओडिसाहून येणाऱ्या शर्मिला बिस्वास आणि त्यांचा चमू मनोदर्पण हा सामूहिक नृत्याविष्कार सादर करणार आहे. या नृत्यप्रकारासह कन्व्हर्स माध्यमातून अमृता लाहिरी आणि पवित्रा भट्ट कुचीपुडी आणि भरनाट्यमची जुगलबंदी सादर करणार आहेत. तर प्रख्यात भरतनाट्यम नर्तिका पद्मा सुब्रमण्यम यांची नात नृत्यांगना महती कन्नन नृत्य सादर करतील. महोत्सवाचा समारोप हा पार्वती मेनन आणि शिजीथ नांबियार यांच्या धी अवर थाॅट्स या नृत्याविष्काराने करणार आहेत.