मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पक्षाने १ कोटी ८० लक्ष रुपयांचा कृतज्ञता कोष त्यांच्याकडे सुपुर्द केला. या निधीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी खा. पवार यांनी तरुणाईला साद घालत यापुढे तरुणांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पवार यांचा ८० वा वाढदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला गेला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे झालेल्या या सोहळ्यात पवारांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी विविध स्तरातील लोकांनी गर्दी केली होती. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला हेही उपस्थित होते. यावेळी अनेकांची भाषणे झाली.
दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे छत्रपतींनी दाखवून दिले आणि आता दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तर खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, देशाला दिशा देवू शकतो असा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहेत. या वयातही त्यांच्याकडे प्रत्येक क्षेत्रातील माहिती असते. मधल्या काळात माझ्यावर अनेक संकटे आली. मी संपतो की काय असे वाटत असताना केवळ शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुनर्जन्म झाला आह, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
अनिल गोटेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसंग्राम पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. गिरीष महाजन, जयकुमार रावल, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे ‘वर्षा’ नाईट क्लबचे सदस्य होते. स्वपक्षातल्या जनाधार असणाºया नेत्यांना संपवण्याचे काम या लोकांनी केले, असा आरोपही त्यांनी केला.
...म्हणून जन्मदिवस आठवतो
पवार म्हणाले, माझा जन्मदिवस माझ्या लक्षात रहात नाही; परंतु माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर तर ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचा जन्मदिवस ११ डिसेंबर आहे. त्यामुळे मला माझा वाढदिवस आपोआप आठवतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावावर बँकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करणार आहे. शेतकºयांची मुले आत्मसन्माने उभी राहण्यासाठी प्रयत्न करू.