Join us

दसरा मेळावा ठाकरेंचा तर बॅनरबाजी राष्ट्रवादीची; परंपरा कायम राखण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 10:46 AM

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई - शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच रंगलं आहे. यंदा शिवसेनेत २ गट पडले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसीच्या मैदानावर दसरा मेळावा घेणार आहेत. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दादरच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. शिंदे-ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केले आहेत. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 

त्यात मातोश्रीबाहेर लावलेल्या एका बॅनरनं सगळ्यांचे लक्ष वेधले. दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहावी यासाठी राष्ट्रवादीकडून बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनरवर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सचिन अहिर, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. एक संघटना, एक विचार आणि एकच मैदान शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या असं सांगत खूप खूप शुभेच्छा राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई सचिव दिनेशचंद्र हुलवळे, राजू घुगे यांनी हे बॅनर्स लावले आहेत. 

ठाकरे गटाला न्यायालयाची परवानगीयंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आणण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस