Join us

राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लगीनघाई, जयंत पाटील म्हणाले एकही फिक्स नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 6:32 PM

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्यालाच तिकीट मिळणार असा दावा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची लगीनघाई सुरू झाली आहे. तर, अनेक पक्षांचे उमेदवार स्वत:हून गुडग्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. त्यामुळे, अद्याप राष्ट्रवादीकडून कुठल्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नसून एकही उमेदवार ठरला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. तसेच आगामी निवडणुकीत गतवेळीच्या निवडणुकांचेच उमेदवार असतील, हेही चुकीचं वृत्त असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्यालाच तिकीट मिळणार असा दावा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे वृत्त फेटाळलं असून लोकसभेसाठी अद्याप एकाही जागेवरील उमेदवार निश्चित नसल्याचे स्पष्ट केलंय. राज्यातील एकूण 48 पैकी केवळ 5 मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. यात बारामती (सुप्रिया सुळे), माढा (विजयसिंह मोहित-पाटील), सातारा (उदयनराजे भोसले), कोल्हापूर (धनंजय महाडिक) आणि भंडारा-गोंदिया (मधुकर कुकडे) या मतदारसंघांचा समावेश आहे. हे पाचही मतदारसंघ कायम राखण्याचा राष्ट्रवादीला विश्वास आहे. याशिवाय रायगड, मावळ, शिरुर, बुलढाणा, परभणी या मतदारसंघातही राष्ट्रवादीला यश मिळेल, असं अंतर्गत अहवाल सांगतो. मात्र, गतवर्षी विजयी झालेले उमेदवार यंदाच्या निवडणुकांमध्येही त्याच जागेवरुन निवडणूक लढवतील, हा दावा खोटा ठरला आहे. कारण, 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी निवडूण आलेल्या उमेदवारांना यंदाही तेथून तिकीट देण्यात येईलच हे निश्चित नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटीललोकसभा निवडणूक २०१९