राष्ट्रवादीतील वाद शमेना, नियोजनाच्या बैठकीतच गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:45 AM2019-04-01T04:45:52+5:302019-04-01T04:46:18+5:30
नियोजनाच्या बैठकीतच गोंधळ : निरीक्षकांनी खडसावले, जिल्हाध्यक्षांचे भाषण रोखले
कल्याण : नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरूच असल्याचे रविवारी पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी आणि कल्याणसाठी झालेल्या संयुक्त नियोजनाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी रविवारी गोंधळ घातला. विधानसभा आणि वॉर्डनिहाय नियुक्त्यांवरून जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांना लक्ष्य करत त्यांचे भाषण मध्येच रोखले. या गोंधळात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा निरीक्षक सुभाष पिसाळ यांनी तुमची ‘शाळा’ बंद करा, अशा शब्दांत हनुमंते यांना सुनावले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेला हा तमाशा चर्चेचा विषय ठरला होता.
कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील प्रचाराच्या नियोजनाबाबत येथील पश्चिमेकडील सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला निरीक्षक सुभाष पिसाळ, आमदार जगन्नाथ शिंदे, डॉ. वंडार पाटील, महेश तपासे आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह भिवंडीचे उमेदवार सुरेश टावरे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील उपस्थित होते. दरम्यान, टावरे आणि पाटील यांनी बैठकीला उपस्थिती लावण्यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हनुमंते हे प्रचारासंदर्भात जिल्हानिहाय नियुक्त केलेल्या पदाधिकाºयांची माहिती देत होते. त्यावेळी काही माजी पदाधिकाºयांनी त्यांना मध्येच थांबवून विधानसभा आणि वॉर्डनिहाय नियुक्त्यांचे काय झाले? आता ज्या नियुक्त्या केल्या आहेत, ती बोगस नावे आहेत, ते कार्यरत आहेत का? ते आता उपस्थित आहेत का, अशा प्रश्नांचा हनुमंते यांच्यावर भडीमार केला. हनुमंते यांनी संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सभागृहात गोंधळ घातला. हनुमंते यांचे मार्गदर्शनही रोखण्यात आले. अखेर, निरीक्षक पिसाळ यांनी आता ‘शाळा’ नका घेऊ, हे थांबवा आणि थेट कार्यक्रम सुरू करा, असे हनुमंते यांना सुनावल्यानंतर वाद शमला. दरम्यान, झालेला गोंधळ पाहता अंतर्गत नाराजी निवडणुकीनंतर दाखवा, मतप्रदर्शन करू नका, एकदिलाने काम करून कल्याण आणि भिवंडीत आघाडीचा उमेदवार निवडून आणा, अशा शब्दांत आमदार शिंदे यांनी समज दिली. हनुमंते तुम्ही चांगले काम करता, परंतु सर्वांना विश्वासात घेऊन काम करा, असे पिसाळ म्हणाले.
दरम्यान, विद्यमान खासदार आणि आपल्या कार्यपद्धतीत फरक आहे. मी खासदार असताना कोणतेही कंत्राट घेतले नाही. कोणाकडे कार्यक्रमासाठी पावती पाठवलेली नाही, अशा शब्दांत सुरेश टावरे यांनी टीका केली. यावेळी मोदीलाट नाही. त्यामुळे ही निवडणूक सेनेसाठी सोपी नसल्याचा दावा कल्याण लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी केला.
काँग्रेस पदाधिकाºयांची दांडी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची नियोजनाची संयुक्त बैठक होती. प्रदेश प्रतिनिधी तथा डोंबिवलीतील पक्षाचे माजी नगरसेवक संतोष केणे वगळता कल्याण पश्चिमेमधील पदाधिकाºयांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. भिवंडीचे उमेदवार टावरे यांच्यासोबतही मोजकेच पदाधिकारी बैठकीला आले होते. कल्याणमधील पदाधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.