ठाण्यात राष्ट्रवादीचे माफी आंदोलन
By Admin | Published: August 20, 2015 02:07 AM2015-08-20T02:07:47+5:302015-08-20T02:07:47+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी ठाणे शहरामध्ये कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र
ठाणे : बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी ठाणे शहरामध्ये कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा नाका येथे निषेधासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. ‘शिवाजी महाराजांच्या बदनामीला मिळालेली राजमान्यता आम्ही रोखू शकलो नाही. महाराज, आम्हाला माफ करा,’ अशा शब्दांत त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी माफी मागितली. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मात्र मुंबईतील राजभवनात पुरस्काराच्या वितरण सोहळ्यानंतर ठाण्यात जल्लोष साजरा केला.
दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त ठेवला होता. संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. पुरंदरे यांना राज्य शासनाच्या दिलेल्या महाराष्ट्र भूषण या पुरस्काराच्या अनुषंगाने राज्यभरात काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा पुरस्कार प्रदान करण्याच्या पाच तास आधी म्हणजे दुपारी १२ वाजता कळवा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. आमच्यासाठी हा दिवस काळा असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ठामपातील विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, मुकुंद केणी, नगरसेवक शानू पठाण, अमित सरय्या, मिलिंद पाटील, तकी चौलकर आदी उपस्थित होते. तर खबरदारी म्हणून ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या २० कार्यकर्त्यांना कोणताही अनुचित प्रकार न करण्याबाबत नोटिसा पाठविल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.