राष्ट्रवादीचे माजी नेते सदानंद लाड यांनी मंदिरातच घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:04 AM2019-01-17T06:04:44+5:302019-01-17T06:04:58+5:30
गुन्हा दाखल, विकासकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
मुंबई : राष्ट्रवादीचे माजी नेते आणि चित्रपट निर्माते सदानंद लाड उर्फ पप्पू लाड (५१) यांनी बुधवारी मंदिरातच गळफास घेत आत्महत्या केली. सिद्धार्थ ग्रुपचे विकासक आणि ताहिर भाई यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे, त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमधून उघड झाले आहे.
गायवाडी येथील राजेंद्र मेंशन परिसरात ते कुटुंबासह राहायचे. त्यांनी येथीलच मौलाना शौकत अली रोडवर ‘लाडाचा गणपती’चे मंदिर उभारले. बुधवारी सकाळी ९ वाजता ते घरून मंदिरात गेले. मंदिराच्या गच्चीवरील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. पुजाऱ्याच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी लाड यांचा मुलगा अंकुर याला याबाबत कळविले. त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवि आहे.
त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरून डी.बी. मार्ग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लाड हे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय होते. ‘बाप माणूस’सह १५ चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. खंडणीच्या गुन्ह्यातही त्यांच्याकडे चौकशी सुरू होती.