मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या गांभीर्याकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता १४ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय तातडीने करण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्यात यावी, जनावरांचा सांभाळ करण्यासाठी सरकारने स्वत:च्या चारा छावण्या सुरु कराव्यात, विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी, राज्य सरकारच्यावतीने रोजगार हमी योजनेमार्फत उत्पादक स्वरूपाची कामे हाती घेऊन शेतकऱ्यांच्या शेतावरही ही योजना राबवावी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी माफ करून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, दुधाला २५ रुपये भाव देण्यात यावा, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या. सरकार मदत करताना काही जिल्ह्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. तसेच जनावरांच्या छावण्या सरकारने स्वत: सुरू कराव्या, अशी मागणी केली गेली.तटकरे म्हणाले की १४ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
सरकारविरोधात राष्ट्रवादीचे ‘जेल भरो’
By admin | Published: August 24, 2015 1:11 AM