मनोहर कुंभेजकर
मुंबई : आगामी 2022 च्या पालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आत्तापासून तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुद्धा पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी मुंबई सह पश्चिम उपनगरावर आपले लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. वर्सोवा व दिंडोशी विधानसभा मतदार संघात चांगले उमेदवार देण्यासाठी पक्षाने सुरवात केली आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिशन वर्सोवा असा नारा देत पक्षाचे दिगग्ज नेते उद्या वर्सोव्यात येत आहे.या मतदार संघात प्रभाग क्रमांक 59,60,61,62,63 हे पाच प्रभाग असून प्रभाग क्रमांक 64 व 68 या मधील अर्धा भाग येतो.राष्ट्रवाढी काँग्रेस पार्टी येथून आपले उमेदवार उभे करणार आहे.
उत्तर पश्चिम जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षांची महत्वाची बैठक नुकतीच जिल्हा अध्यक्ष अजित रावराणे यांनी पक्षाच्या दिंडोशी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती. राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते नरेंद वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाला चांगले काम करणाऱ्या तालुका अध्यक्षांचा वर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न करून आगामी पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
वर्सोवा, फिशरिज रोड येथील सनबिन अपार्टमेंट येथील पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन उद्या दि,20 रोजी सायंकाळी 5 वाजता राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते होणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच निमंत्रक नरेंद वर्मा यांनी लोकमतला ही माहिती दिली.