राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 14:21 IST2019-10-31T14:20:54+5:302019-10-31T14:21:29+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यामध्ये भेटीगाठी सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा व शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यामध्ये भेटीगाठी सुरु आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अतुल बेनके यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. मनसेने जुन्नरमध्ये उमेदवार न देता राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांना पाठिंबा दिला होता. यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे अतुल बेनके यांनी सांगितले.
अतुल बोनके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जुन्नर मतदारसंघातून शिवसेनेचे शरद सोनावणे यांच्याविरुद्ध तिकीट दिली होती. शिवसेनेचे शरद सोनावणे 2014 साली मनसेच्या तिकीटावर जुन्नरमधून निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं शरद सोनावणे यांना जुन्नरमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा राष्ट्रवादीच्या अतुल बेनके यांनी त्यांचा पराभव केला.
संदीप देशपांडे शरद पवारांच्या भेटीला; राज ठाकरेंसोबतही करणार चर्चा
दरम्यान मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या निवडणुकीतील कार्यपद्धतीने प्रभावित झाल्यामुळे मी त्यांची भेट घेतल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात शरद पवार मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे समजते आहे.