निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा वापर केला ; राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 07:55 AM2020-02-12T07:55:03+5:302020-02-12T08:01:00+5:30
विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनीन्यायालयात दाखल केली आहे. राम शिंदे यांच्या या आरोपानंतर न्यायालयाने रोहित यांना समन्स बजावत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मला कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपदेखील याचिकेतून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या याचिकेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचादेखील उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर रोहित पवार एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मी प्रामाणिकपणे निवडणुक लढवली आहे. निवडणुकीत माझा विजय झाला तो लोकांचा निर्णय होता. मात्र तरीदेखील भाजपाचे पराभूत झालेले उमेदवार राम शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असं रोहित पवार यांनी सांगितले.
राम शिंदे यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तसाच आमचाही असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला न्यायालयाकडून आतापर्यत कोणत्याही प्रकारचे समन्स आलेले नाही. त्यामुळे राम शिंदे कोणत्यासंदर्भात न्यायालयात गेले आहे आणि त्यांनी कोणते मुद्दे मांडले आहे यासंदर्भात मला नोटीस हाती आल्यानंतर समजेल. त्यानंतर मी यावर भाष्य करणार असल्याचे देखील रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
राम शिंदेंनी याचिकेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. 'निवडणुकीच्या काळात रोहित पवार यांनी त्यांच्या साखर कारखान्यातल्या १०० कर्मचाऱ्यांच्या वापर करुन पैशांचं वाटप केलं. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना आपण त्यावेळीच रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं,' असं राम शिंदेंनी याचिकेत नमूद केले असल्याचे सांगण्यात येत आहे.