नवी मुंबई : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्रा शिर्के यांची निवड झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवाराचा दोन मतांनी पराभव केला असून, पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळविला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी पालिका मुख्यालयामध्ये निवडणूक झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीचे ९ सदस्य व शिवसेना-भाजपाचे ७ सदस्य आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची सरशी होणार असल्याचे स्पष्ट होते. परंतु शिवसेना नेत्यांनी पुन्हा चमत्कार होण्याचे सूतोवाच केले होते. काँगे्रसच्या एकमेव सदस्यास बाजूला वळवून दोन्ही उमेदवारांना समान मते मिळतील व नंतर लॉटरी काढून सभापती ठरविला जाईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु या सर्व वल्गनाच ठरल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्रा शिर्के यांनी शिवसेनेच्या कोमल वास्कर यांचा दोन मतांनी पराभव केला. पहिल्यांदाच महिलेची सभापतीपदावर निवड झाल्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांनी अभिनंदन केले. स्थायी समिती निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी काम पाहिले. आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, सभागृह नेते जे. डी. सुतार यांनी सभापतींचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)पारदर्शी कारभार करणार नवनिर्वाचित सभापती नेत्रा शिर्के यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांनी या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. स्थायीची पहिली महिला सभापती होण्याचा मान मिळाला, याचा आनंद आहे. पारदर्शी काम करण्यावर लक्ष दिले जाईल. शहरातील विकासकामांचा दर्जा चांगला राहावा यासाठी प्रयत्न केले जातील.- नेत्रा शिर्के, स्थायी समिती सभापतीआजवरचे सभापतीच्शशिकांत बिराजदार, मोहन मढवी (दोन वेळा), विठ्ठल मोरे, बुधाजी भोईर, सुदाम हिवरकर, डी. आर. पाटील, जयवंत सुतार, संतोष शेट्टी, श्याम महाडिक, डॉ. जयाजी नाथ, विजय चौगुलेए संदीप नाईक (तीन वेळा), अनंत सुतार, रमेश गोविंद शिंदे, संपत शेवाळे, सुरेश कुलकर्णी (दोन वेळा)
स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नेत्रा शिर्के
By admin | Published: May 28, 2015 12:21 AM