Join us

रोहित पवारांची चौकशी, राष्ट्रवादीची रणनीती ठरली; शरद पवार तळ ठोकणार, तर सुप्रिया सुळे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 1:56 PM

जेव्हा रोहित पवार ईडी कार्यालयात जातील तेव्हा राष्ट्रवादीकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.

NCP Rohit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडित कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना समन्स जारी केलं आहे. त्यामुळे रोहित पवार यांना २४ जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीयर येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. अशा स्थितीत अडचणीत आलेल्या रोहित पवार यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या रोहित पवार हे ईडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिवसभर शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे समजते.

राजकीय सूडबुद्धीतून रोहित पवार यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केला जात आहे. त्यामुळे उद्या जेव्हा रोहित पवार ईडी कार्यालयात जातील तेव्हा पक्षाकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्या मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 

सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत सोडणार

अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीसह पवार कुटुंबातही फूट पडली आहे. अशा स्थितीत कुटुंबातील तरुणावर आलेल्या या राजकीय संकटाच्या काळात त्यांना साथ देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यास येणार आहेत. या रणनीतीद्वारे राष्ट्रवादीकडून लोकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे.

रोहित पवारांवर काय आहे आरोप?

राज्य सहकारी शिखर बँकेत झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यानंतर त्याचा शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते. मात्र, लिलावाच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होता व त्यावेळी केवळ ५० कोटी रुपयांना बारामती ॲग्रोने या कारखान्याची खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच, या लिलाव प्रक्रियेत ज्या कंपन्या सहभागी झाल्या, त्यांच्यातही एकमेकांत झालेले आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचे समजते. 

व्यवहारात मनी लाँड्रिंग  

- बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लि. आणि समृद्धी शुगर प्रा. लि. या कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती, ती रक्कम त्या कंपनीने बारामती ॲग्रोकडून घेतल्याची चर्चा आहे.

- बारामती ॲग्रोने कन्नड कारखान्याच्या खरेदीसाठी जी रक्कम दिली, ती रक्कम कंपनीने विविध बँकांतून स्वतःच्या कंपनीच्या खेळत्या भांडवलासाठी घेतली होती. मात्र, त्याचा वापर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीसाठी केल्याचा आरोप आहे. 

- शिखर बँकेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी घोटाळा झाला नसल्याचे सांगत पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. परंतु, २०२२ मध्ये न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाला. या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :शरद पवाररोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळे