पोटनिवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीचा पाठिंबा
By admin | Published: January 5, 2016 02:45 AM2016-01-05T02:45:10+5:302016-01-05T02:45:10+5:30
चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १४७ मध्ये होणाऱ्या पालिका पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेसचे उमेदवार राजेंद्र नगराळे यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबई : चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १४७ मध्ये होणाऱ्या पालिका पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेसचे उमेदवार राजेंद्र नगराळे यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या या पोटनिवडणुकीत युती विरुद्ध कॉँग्रेस आघाडी असे चित्र आहे.
या वॉर्डातून कॉँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या नगरसेवक अनिल पाटणकर यांनी चार महिन्यांपूर्वी सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे प्रभाग प्रभाग क्र. १४७ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. सेनेने पाटणकर यांना उमेदवारी दिली असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसकडून राजेंद्र नगराळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याशिवाय ५ अपक्ष उमेदवारदेखील रिंगणात आहेत.
काँग्रेससह राष्ट्रवादीकडून दीपक सावंत हेदेखील या ठिकाणी इच्छुक होते. मात्र पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत कॉँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर
केला आहे. शनिवारी नगराळे
यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते झाले. या वेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर उपस्थित होते. (प्रतिनिधी)