कन्हैया कुमारच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:35 PM2019-03-28T17:35:50+5:302019-03-28T17:37:07+5:30
बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई - काँग्रेसच्या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी हिरीरीने उतरणार असून राष्ट्रवादीचे नेते रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार आहे. तसेच बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना डी.पी त्रिपाठी म्हणाले की, ज्या ठिकाणी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नाहीत, तिथे जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराला मोदींच्या विरोधात ताकद देणार आहोत. शिवाय वाराणसीमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा मिळून एकच उमेदवार देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्रिपाठी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाच्या प्रदर्शनावरही राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आचारसंहितेचे सक्तीने पालन व्हायला हवे. एखाद्या राजकीय नेत्याचे बायोपिक येणार असेल, तर त्यातील गोष्टींकडे निवडणूक आयोगाने लक्ष देऊन आवश्यकतेनुसार कारवाई करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
विद्यार्थी नेता म्हणून प्रकाशात आलेले कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. महाआघाडीनं तिकीट न दिल्यानं कन्हैया कुमार बेगुसराय मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे. कन्हैया कुमार बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, मोदी लाटेतही स्वत:चा ठसा उमटवणारे राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन यांच्याशी कन्हैया कुमार यांना दोन हात करावे लागणार आहेत. कन्हैया कुमार यांना इतर डाव्या पक्षांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.