Join us  

रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक

By admin | Published: May 22, 2014 4:39 AM

रायगड लोकसभा निवडणुकीत तटकरेंच्या झालेल्या निसटत्या पराभवानंतर कार्यकर्ते आणि नेतेमंडळींमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचे वादळ उठलेले होते

रोहा : रायगड लोकसभा निवडणुकीत तटकरेंच्या झालेल्या निसटत्या पराभवानंतर कार्यकर्ते आणि नेतेमंडळींमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचे वादळ उठलेले होते. यावर मंगळवारी आमदार अनिल तटकरे यांनी पक्षाच्या बोलावलेल्या बैठकीत सुरुवातही अनिल तटकरेंनी केली. शेवटही त्यांनीच केला. कुणालाही काहीच बोलू दिले नाही. घटलेल्या मतांची नैतिक जबाबदारी आपण स्वीकारल्याचे आणि साहेबांनी राजीनामे फेटाळल्याचे अनिल तटकरे यांनी या सभेत जाहीर के ले. लोकसभा निवडणुकीत तटकरेंना तालुक्यात घटलेल्या मतदानामुळे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. तालुकाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह काहींनी आपल्या पदांचे राजीनामे ही सादर केले होते. यावर अनिल तटकरे यांनी कोलाड येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात बोलविलेल्या पक्षाच्या बैठकीची सुरुवातही त्यांनीच केली आणि शेवट ही त्यांनीच करून टाकला. परिणामी मते का घटली यावर कसलेही व कोणत्याही प्रकारचा विचारविनिमय मात्र झाला नाही. उपस्थितांना आपल्या नेत्यांनी कार्यपद्धतीत बदल करावेत असे अनेकांना मांडायचे होते. कार्यकर्त्यांच्या या बदललेल्या सुराची माहिती अनिल तटकरेंना आधीच ज्ञात होती. या सर्वांच्या नाराजीवर मी राजीनामा देवू का? असे अनिल तटकरे यांनी उपस्थितांना दोन वेळा विचारले आणि विषय आवरता घेतला. या व्यतिरिक्त ज्यांनी कुणी राजीनामे दिलेले आहेत. त्या सर्वांचे राजीनामे सुनील तटकरे यांनी फेटाळले असल्याचे अनिल तटकरे यांनी सांगितले. सदर सभेत पक्षात राहून विरोधात काम करणार्‍यांवर कोणती कारवाई होणार? असा प्रश्न एकाने उपस्थित करताच, आता यावर चर्चा नको असे त्यांनी सांगितले. एका हळदी समारंभात आपल्या पत्नीस सांगण्यात आले की गवळ्याला कशाला मते देता, त्यावर तिने वादावादी केल्याचे वयोवृद्ध कार्यकर्त्याने हे वाक्य सभेत बोलताच अनिल तटकरेंनी जातीपातीचा विषय अजिबात काढू नका, असे स्पष्ट केले. यंदाच्या निवडणुकीत राबविलेल्या चुकीच्या प्रचार यंत्रणेबाबतही या सभेत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर ज्यांची वार्डात निवडून यायची पात्रता नाही, अशांना महाराष्टÑ प्रदेश आणि जिल्हास्तरीय पदांच्या खिरापती वाटल्या गेल्याने, याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याने तसेच यापुढे स्वच्छ व प्रतिमेच्या कार्यकर्त्यांची अशा पदांवर वर्णी लावावी असे सांगण्यात आल्याचे समजते आहे. (वार्ताहर)