Join us  

NCRB Report 2022 : देशातील सर्वात सुरक्षित शहर मुंबई नाही तर कोलकाता; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 3:42 PM

क्राइम इन इंडिया २०२२ या नावाने जारी झालेल्या अहवालात देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा डेटा दाखवण्यात आला आहे.

NCRB Report 2022 : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) दरवर्षी एक डेटा प्रसिद्ध करत असते, जे देशातील सर्वात सुरक्षित आणि असुरक्षित शहरे दर्शवते. क्राइम इन इंडिया २०२२ या नावाने जारी झालेल्या अहवालात देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा डेटा दाखवण्यात आला आहे. यामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे दाखल होत आहेत यावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच याच आकडेवारीवरून सिद्ध झाले की, कोलकाता हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर आहे. कारण इथे एक लाख लोकसंख्येमागे १०० पेक्षा कमी गुन्ह्यांची नोंद आहे. हे असे गुन्हे आहेत जे गंभीर स्वरूपाचे असून आरोपींना पोलीस तातडीने अटक करू शकतात. 

क्राइम ब्युरोच्या अहवालानुसार कोलकातामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे केवळ ८६.५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, पुण्यात २८०, हैदराबादमध्ये २९९ गुन्हे घडले आहेत. क्राइम ब्युरोने जाहीर केलेली आकडेवारी ही केवळ नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर आहे, ज्याचा सर्व लेखाजोखा पोलिसांकडे आहे. कोलकाता येथे गुन्ह्यांमध्ये सातत्याने घट होत असल्याचे उघडकीस आले. कारण २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १६% ची घट झाली.

कोलकातात महिला पोलीस स्थानकांची पुरेशी संख्यापश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहराची तुलना इतर १८ मोठ्या शहरांसोबत केली जाते, ज्यांची लोकसंख्या २० लाखाहून अधिक असून, तिथे सर्व जाती, धर्माचे लोक राहतात. कोलकाता शहर सलग तिसऱ्यांदा सुरक्षित शहरांच्या यादीत अव्वल आले आहे. या मागे काही मूलभूत कारणे देखील आहेत. या शहरात एकूण ८३ पोलीस स्थानके असून त्यापैकी ९ महिला पोलीस स्थानके आहेत. सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी दोन अतिरिक्त पोलीस स्थानके उभारण्यात आली आहेत. याशिवाय कोलकाता सुरक्षित असण्यामागे कोलकाताची पारंपारिक विचारसरणी देखील कारणीभूत मानली जाते. 

पूर्वीपासून विकसित शहर इंग्रजांच्या राजवटीपासूनच कोलकाता शहर बऱ्यापैकी विकसित आहे. रस्त्यांपासून ते वैद्यकीय शाळा, महाविद्यालये इथे बांधली गेली. ब्रिटिशांच्या काळात लंडननंतर या शहराकडे सर्वाधिक लक्ष वेधले गेले. समाजातील उच्चशिक्षित वर्गही येथे स्थायिक होऊ लागला. त्याचा परिणाम आजतागायत दिसत आहे. बऱ्यापैकी सुशिक्षित समाज असल्याने लोक अभ्यासात गुंतलेले असतात आणि गुन्हेगारीकडे त्यांचा कल कमी असतो. कोलकाता अन् व्यापारया शहरात शतकानुशतके व्यापार सुरू आहे. मसाले आणि कपड्यांचा कच्चा माल जगातील अनेक देशांत इथून गेला आणि ही ये-जा सुरू राहिली. हे व्यापारी केंद्र असल्याने येथे प्रशासन कार्यक्षम राहिले. व्यवसायावर परिणाम होईल अशा कोणत्याही गोष्टीला तोंड वर काढण्याची संधी मिळाली नाही. आजही जगभरातील लोक कोलकाता शहराला आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी येतात आणि त्यापैकी बहुतेकांना इथे सुरक्षित वाटते. तसेच कोलकाता इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी खर्चिक आहे. इथे अत्यंत कमी खर्चात राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था केली जाते. इतर राज्यातून, देशातून आलेली मंडळी कमी खर्चात आपले जीवन जगू शकतात. त्याचा थेट परिणाम गुन्हेगारी दरावर दिसून येत आहे. 

दहशतवादी हल्ल्याने मुंबईचे चित्र बदललेदेशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई... मुंबई म्हणजे अनेकांसाठी स्वप्ननगरी. छोट्या खेड्यातून येणारा कोणीही व्यक्ती एक स्वप्न उराशी बाळगून या शहरात येतो आणि आपल्या स्वप्नासाठी झटतो. मुंबईला मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणूनही संबोधले गेले. परंतु, सर्वेक्षणांमध्ये मुंबईची रँकिंग सतत कमी होताना दिसत आहे. सेफ सिटी इंडेक्सने (SCI) सुरक्षिततेच्या बाबतीत ६० शहरांमध्ये मुंबईला ५० वे स्थान दिले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षित शहरांच्या क्रमवारीत सातत्याने घसरण होत गेली. 

टॅग्स :मुंबईभारत